Home विशेष ऐतिहासिक वारशाचे संवर्धन ही काळाची गरज; नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देणे...

ऐतिहासिक वारशाचे संवर्धन ही काळाची गरज; नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देणे आवश्यक – काजल जंजिरे

6
ऐतिहासिक वारशाचे संवर्धन ही काळाची गरज; नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देणे आवश्यक – काजल जंजिरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – इतिहास जतन करणे म्हणजे केवळ जुन्या वास्तूंचे संरक्षण करणे नव्हे, तर त्यांच्याशी संबंधित सत्य, स्मृती आणि सांस्कृतिक संदर्भ यांचेही जतन करणे होय. त्यासाठी ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनाविषयी समाजात जागरूकता निर्माण होण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन लेखिका व प्रसिद्ध वास्तुविशारद सौ. काजल महेश जंजिरे यांनी केले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील धर्मवीर गड या किल्ल्याबाबत सविस्तर माहिती असलेले पुस्तक पेडगावच्या रहिवासी असलेल्या लेखिका सौ. काजल महेश जंजिरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारले आहे. या माहितीपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आमदार विक्रमसिंह पाचपुते व आमदार हेमंत ओगले यांच्या हस्ते धर्मवीर गड किल्ला परिसरात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. त्यावेळी लेखिका सौ. काजल जंजिरे बोलत होत्या.

आमदार पाचपुते यांच्या काष्टी गावची सुकन्या व आमदार ओगले यांच्या पेडगाव गावच्या स्नुषा असलेल्या सौ. काजल जंजिरे यांनी यावेळी पुस्तक निर्मिती प्रक्रियेचा पट उपस्थितांसमोर उलगडला. हे पुस्तक संभाजी महाराजांच्या शौर्याचे विविध पैलू व धर्मवीर गडाच्या ऐतिहासिक वारशाची माहिती नव्या पिढीसमोर बिंबविण्यासाठी एक सक्षम माध्यम व पर्याय आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्रीय राखीव पोलिस दलात सहाय्यक कमांडंट या पदावर कार्यरत असलेले पती महेश ईश्वर जंजिरे यांचा भक्कम पाठिंबा, प्रोत्साहन व विशेष योगदान तसेच सासू-सासरे व आई-वडिलांचा आशीर्वाद यामुळेच पुस्तक निर्मितीची प्रक्रिया लीलया पार पडली, असेही लेखिका काजल यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

आमदार पाचपुते व आमदार ओगले यांनी यावेळी लेखिका सौ. काजल जंजिरे यांचे तोंडभरून कौतुक केले. राज्यातील विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व आमदारांपर्यंत गावच्या सूनबाई सौ. काजल यांनी शब्दबद्ध केलेल्या धर्मवीर गड या पुस्तकाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचे शौर्य आणि पेडगावच्या धर्मवीर गडाचा इतिहास व महत्त्व या बाबी पोहोचविणार असल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी स्पष्ट केले.

आमदार पाचपुते यांनी काष्टी गावची लेक असलेल्या सौ. काजल या एक सिद्धहस्त लेखिका, चाणाक्ष आणि चतुर संशोधक आणि उत्कृष्ट वास्तुविशारद म्हणून अभिमान व गर्व असल्याचे सांगितले. त्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पाचपुते यांच्या वक्तव्याला पाठिंबा व्यक्त केला. धर्मवीर गडाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी भरीव निधी आणण्यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहे, असेही पाचपुते म्हणाले.

ज्येष्ठ नेते अॅड. डी. डी. घोरपडे, इतिहासकार प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ, मसापचे विभागीय अध्यक्ष जयंत येलूलकर, कवी चंद्रकांत पालवे, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, निवृत्त आयपीएस अधिकारी हेमंतराजे गायकवाड, पेडगावचे सरपंच इरफानभाई पिरजादे आदींची भाषणे झाली.

गणराज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाला वरिष्ठ पत्रकार व मुंबई हायकोर्टातील वकील डॉ. बाळासाहेब बोठेपाटील यांची प्रस्तावना आहे. ‘गणराज’ चे संचालक प्रा. गणेश भगत, ‘क्रिएटिव्ह कम्युनिकेशन्स’ चे संचालक व ज्येष्ठ संपादक जयंतराव देशपांडे आणि गणेश मुद्रणालयाचे संचालक गणेशसेठ दळवी यांचे या पुस्तकाच्या निर्मितीसाठी वेळोवेळी सहकार्य मिळाल्याचे लेखिका काजल जंजिरे यांनी नमूद केले.

अॅड. डॉ. बाळासाहेब बोठेपाटील यांनी प्रास्ताविक केले. लेखिका काजल जंजिरे यांचे सासरे ईश्वर जंजिरे, सासू सुनीता जंजिरे, वडील सुनील दरेकर, आई अश्विनी दरेकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जंजिरे व युवा नेते महेश दरेकर यांनी स्वागत केले. पत्रकार विशाल चव्हाण यांनी आपल्या खास खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. गणेश भगत यांनी आभार मानले. राज्यातील विविध क्षेत्रातील मंडळी तसेच महेश जंजिरे यांचे स्नेही असलेले विविध खात्यांमधील राज्यभरातील अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी धर्मवीर गडाच्या सुमारे ९० एकर क्षेत्रातील वास्तू, मंदिरे व ऐतिहासिक वारशाची पाहणी करून माहिती घेण्याची संधी साधली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here